
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीआयच्या उच्चाधिकाऱ्यांमधील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात होती. मात्र ही सुनावणी आता शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केंद्रीय सतर्कता आयोगासमोर (सीव्हीसी) समोर हजेरी लावली असून आपली बाजू त्यामध्ये मांडली आहे. आज सीव्हीसीचा अहवाल एकां बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सीव्हीसीने आलोक वर्मा प्रकरणाचा तपास केला आहे. त्याचा अहवाल आज सोपवण्यात आला. हा तपास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एके पटनायक यांनी केला आहे. आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठासमोर याची सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून शुक्रवारी त्यावर सुनावणी होईल.





























































