
रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी ओरायकल कंपनीने चार लाख डॉलर्सची लाच दिल्या प्रकरणी ओरायकल कंपनीला युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ऍण्ड एक्स्चेंज कमिशनने 23 दशलक्ष डॉलर्स दंड ठोठावला आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली. हा घोटाळा झाला तेव्हा रेल्वे मंत्री पीयूष गोयल होते. त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे तपासे म्हणाले. हे कंत्राट ज्यांनी दिले त्यांची चौकशी करून त्यांना जनतेसमोर उभे केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
बीकेसीवरील दसरा मेळावा फेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावरील दसरा मेळावा फेल गेला असल्याची टीकाही तपासे यांनी या वेळी केली. राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिताच्या योजना किंवा धोरणे मांडलीच नाहीत, असे ते म्हणाले. काल पाऊस आला असता तर आणि समोरची क्रीप्ट भिजली असती तर शिंदे यांना काय बोलावे हेच सुचले नसते, असा टोलाही त्यांनी मारला.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
अंधेरी येथील विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तशा सूचना दिल्या आहेत, अशी घोषणा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपाने शिवसेना म्हणून शिंदे गटाला जवळ केले असेल तर अंधेरीची जागा सोडायला हवी होती. पण तिथे भाजपाने स्वतःचा उमेदवार दिला. यातून भाजपाचे कारस्थान सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहे, असे तपासे याप्रसंगी म्हणाले. त्यामुळे शिवसेनेची ही जागा दणदणीत मतांनी निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे, असेही तपासे यांनी सांगितले.

























































