वाह रे हजारीलाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कल्याण

शालेय क्रिकेटमध्ये नाबाद १००९ धावांचा पाऊस पाडून विश्वविक्रम करणारा कल्याणचा नवोदित क्रिकेटपट्टू प्रणव धनावडे शालेय अभ्यासक्रमात झळकला आहे. त्याच्या नाबाद एक हजार धावांच्या विश्वविक्रमाची दखल दिल्ली शिक्षण बोर्डाने घेतली आहे. सीबीएसई अभ्यासक्रमात इयत्ता तिसरीच्या हिंदी पाठय़पुस्तकात प्रणवच्या धडाकेबाज खेळावर आधारित ‘वाह रे हजारीलाल’ हा धडा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे.

२०१६ साली कल्याणच्या सुभाष मैदानाकर एच. टी. भंडारी कप आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत के. सी. गांधी शाळेकडून खेळताना प्रणव धनावडेने प्रतिस्पर्धी आर्य गुरुकुल शाळेविरुद्ध झुंझार खेळी केली. यापूर्वीचे सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रम मोडीत काढीत प्रणवने तब्बल १००९ धावांचा डोंगर उभा केला तोही नाबाद. या विश्वविक्रमी खेळीमुळे प्रणव रातोरात जागतिक पातळीवर चमकला.

कष्ट आणि जिद्दीचा प्रकास

बीसीसीआयनेही त्याला स्कॉलरशिप देऊन त्याच्या खेळाला प्रोत्साहन दिले. या नवोदित आणि होतकरू खेळाडूने गरिबीचे भांडवल न करता कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर केलेल्या चमकदार कामगिरीची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी हा संपूर्ण प्रवास सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला आहे. लेखक विकास कुमार यांनी नेमक्या शब्दांत प्रणवच्या विश्वविक्रमी खेळीचा आढावा घेतला आहे.