विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर

महाराष्ट्र स्टेड बोर्डाच्या पाठोपाठ आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. बोर्डाच्या नियोजीत वेळापत्रकानुसार 10वी ची परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत आणि 12वी ची परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत घेतली जाणार आहे. चार महिन्यांपूर्वीच वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

सीबीएसई बोर्डाने आपल्या अधिकृ्त वेबसाईटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना cbse.gov.in या बोर्डाच्या वेबसाईटवर वेळापत्रक पाहता येणार आहे. तसेच परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 आणि 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत विषयानुसार घेतली जाणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 204 विषयांसाठी हिंदुस्थानसह जगभरातील 26 देशांमधून 45 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाने काही दिवसांपूर्वी आपले वेळापत्रक जाहीर केले असून 10वी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. तर, 12वी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे.