सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थ्यांना दिलासा; दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी 75 टक्के उपस्थितीची सक्ती नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात शाळेच्या ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू न शकणाऱ्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाने दिलासा दिला आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेली 75 टक्के हजेरीची अट शिथिल करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन वर्गांना हजर न राहिलेल्या विद्यार्थ्यांना हजेरीपटात 15 टक्क्यांची सवलत देण्यात आली असून बोर्डाच्या परीक्षांसाठी आता 65 टक्के हजेरीचा निकष ग्राह्य धरण्यात येणार आहे.

याआधी केवळ आजारी असल्यासच विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरीत सूट मिळत होती. मात्र आता कोरोनाच्या प्रादुर्भावात काही अडचणी अथवा तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन वर्गांना उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हजेरीच सवलत देण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. माञ ही सूट विद्यार्थ्यांना लॉकडाऊन ते अनलाँक 4 पर्यंतच्या ऑनलाईन वर्गांसाठी मिळणार आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान विद्यार्थी केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून होते. या दरम्यान शाळा बंद असल्याने 75 टक्के हजेरीत सवलत दिली जाणार आहे, असे सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संजय भारद्वाज यांनी स्पष्ट केले.