सीबीएसईचा दहावीचा निकाल 93.66 टक्के, महाराष्ट्राचा निकाल 96.91 टक्के

माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च, 2025मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 93.66 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या 93.60 टक्के निकालाच्या तुलनेत यंदा किंचितशी वाढ झाली आहे. महाराष्ट्राचा निकाल देशाच्या निकालापेक्षा अधिक म्हणजे 96.91 टक्के लागला आहे. बारावीप्रमाणे सीबीएसईच्या दहावीच्या 90 टक्केवाल्यांची संख्याही यंदा रोडावली आहे. महाराष्ट्रातून 1,17,237 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 1,13,257 उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण दीड लाखाने वाढली आहे. देशभरातून 26,675 शाळांमधून 23,71,939 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22,21,636 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे 95 टक्के, तर मुलांचा 92.63 टक्के इतका लागला आहे. सीबीएसईनेही राज्य शिक्षण मंडळाच्या पावलावर पाऊल टाकत मेरीट लिस्ट जाहीर करणे बंद केले आहे.

नवोदय, केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक

नवोदय आणि केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.50 टक्के लागला आहे. तर खासगी शाळांचा निकाल 94.17 टक्के इतका आहे. तसेच सरकारी व अनुदानित शाळांचा निकाल अनुक्रमे 89.26 आणि 83.94 टक्के लागला आहे. सेंट्रल तिबेटियन स्कूलचा निकाल 91.53 टक्के लागला आहे.

90 टक्केवाल्यांची संख्या रोडावली

देशभरात 1,99,944 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. हे प्रमाण 8.43 टक्के इतके आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 9 टक्के होते. 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे 45,516 विद्यार्थी असून त्यांचे प्रमाण 2.14 टक्क्यांवरून 1.92 टक्क्यांवर आले आहे. 66 दिव्यांग विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

सिंधुदुर्ग 99.32, तर रत्नागिरी 98.58 टक्के

रत्नागिरी/सिंधुदुर्ग, दि. 13 (प्रतिनिधी) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. कोकण बोर्डाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण बोर्डाचा निकाल 98.82 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिह्याचा निकाल 98.58 टक्के आणि सिंधुदुर्ग जिह्याचा निकाल 99.32 टक्के लागला आहे, अशी माहिती कोकण बोर्डाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. सलग 14 व्या वेळी कोकण बोर्डाने दहावीच्या परीक्षेत राज्यात अव्वल नंबर राखला आहे.

कोकण बोर्डात दहावीच्या परीक्षेला 26 हजार 861 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 26 हजार 546 उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिह्यात 18 हजार 011 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 17 हजार 756 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिह्यात 8 हजार 850 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 8 हजार 790 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

  • दहावी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे सिंधुदुर्ग जिह्याने गुणवत्तेत आघाडी घेतली असून जिह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक 99.32 टक्के एवढा निकाल लावला आहे, तर वैभववाडी तालुक्यातील सर्व शाळांचा निकालही शंभर टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिह्यात दहावी परीक्षेसाठी 8855 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर प्रत्यक्षात 8850 विद्यार्थी परीक्षेला बसले यात 8790 जण उत्तीर्ण झाले. या निकालात मुलींची टक्केवारी 99.48 टक्के, तर मुलांची टक्केवारी 99.17 टक्के राहिली. तालुकानिहाय निकालामध्ये – वैभववाडी 100 टक्के, सावंतवाडी 99.78 टक्के, दोडामार्ग 99.74 टक्के, वेंगुर्ले 99.41 टक्के, मालवण 99.39 टक्के, कणकवली 99.26 टक्के, कुडाळ 99.14 टक्के आणि देवगड 98.52 टक्के असा निकाल लागला आहे.

0.19 टक्क्याने निकालात घट

गतवर्षीच्या तुलनेने कोकण बोर्डाच्या निकालात 0.19 टक्के घट झाली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचे निकाल 99.01 टक्का होता यंदा 98.82 टक्के आहे.

कॉपीमुक्त कोकण बोर्ड

यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड कॉपीमुक्त बोर्ड ठरले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिह्यांत दहावीच्या परीक्षेत कॉपीचा एकही प्रकार घडला नाही अशी माहिती अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.