पुण्यात खोदकामांमुळे पोलिसांच्या सीसीटीव्हींना ग्रहण; दररोज 40-50 सीसीटीव्ही बंद पडतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

पुणे शहरात महानगरपालिकेने विकासकामांसाठी ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे पुणे पोलिसांच्या सीसीटीव्हीचे कनेक्श खंडित होत आहे. त्यामुळे शहरातील सीसीटीव्हीच्या कनेक्टिविटीचे जाळे तुटत असल्याचे उघडकीस आले आहे. रस्तेदुरस्ती,पदपथासह बंदिस्त नळपाणीपुरवठा योजनसह विविध खोदकामामुळे दिवसाला 40 ते 50 सीसीटीव्ही डिस्कनेक्ट होत आहेत. त्यामुळे सीसीटीव्हींद्वारे रेकॉर्डिंग होत नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थेसह सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात मोठा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हींचे चित्रीकरण मिळविताना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरी संबंधिताविरूद्ध कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

रस्ते आणि पदपथ दुरुस्तीच्या कामांमुळे पुणे शहर पोलिसांचे 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेरे दररोज बंद पडत आहेत. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून तत्काळ कारवाई न केल्यामुळे सीसीटीव्हींद्वारे रेकॉडिंग होत नसल्याचे दिसून आले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हींची कनेक्टीविटी महत्वाची आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारासह महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात येतो. मात्र, त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परिसरात एखादा मोठा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हींद्वारे होणारे रेकॉर्डिंग मिळविण्यास अडथळा निर्माण होणार आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमध्ये विकासकामांचा धडाका सुरू आहे. मात्र, शहराचा विकासासाठी ही कामे होत आहेत. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा सुव्यवस्थेसासाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींची कनेक्टीविटी तत्काळ दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

कायदा सुव्यवस्थेसाठी पुणे शहरातील विविध भागात तब्बल 1 हजार 340 सीसीटीव्ही कॅमेऱ्ंयाद्वारे नजर ठेवली जाते. त्याद्वारे पुणे पोलीस वेगवेगळे रस्ते आणि संवेदनशील ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवतात. त्याशिवाय वाहतूककोंडी टाळून वाहतूक सुरळित करण्यासाठीही सीसीटीव्हींची मदत घेतली जाते. मात्र, रस्ते दुरूस्ती, पथकामांमुळे सीसीटीव्हींचे रेकॉर्डिंग होत नाही. परिणामी गुन्हेगारांच्या हालचालीसह इतर काही घटनांचे फूटेज मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गुन्ह्यांचा शोध शोधण्यासाठी फुटेज महत्वाचे ठरतो. मात्र, खोदकामामुळे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचे सीसीटीव्हींचे कनेक्शन खंडित झाल्यामुळे थेट फुटेजचे फीड मिळत नाही. त्यामुळे विकासकामे करताना सीसीटीव्ही कनेक्शन खंडित होणार नाही याची संबंधित ठेकेदारांनी काळजी घेण्याची गरज आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून त्यांनी याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध कारवाईस अडथळा
सीसीटीव्हींची कनेक्टीविटी तुटत असल्यामुळे शहरातील विविध भागात वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्तांविरूद्ध कारवाईस अडथळा निर्माण झाला आहे. झेब्रा क्रॉसिंग, ट्रीपलसीट प्रवास, सिग्नल तोडणाऱ्यांविरूद्ध कारवाई करता येत नसल्यामुळे वाहतूक पोलीस विभागालाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे. विकासकामांमुळे सीसीटीव्हींची केबल तुटल्यामुळे वाहतूक नियंत्रण कक्षाला फीड मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कर्मचाऱ्यांकडून सीसीटीव्हीद्वारे परिसरातील वाहतूककोंडी सोडविता येत नसल्यामुळे वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.