स्कूल बस, व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक! पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आदेश

विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱया स्कूल बस आणि व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असून, विद्यार्थिनी असणाऱया शाळेच्या बसमध्ये महिला कर्मचाऱयांची नियुक्ती अनिवार्य आहे, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शाळा व्यवस्थापन आणि खासगी वाहतूक करणाच्या रिक्षा आणि व्हॅन चालकांना दिले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक झाली. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

यावेळी अपर अधीक्षक वैभव कलुबर्गे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, महापालिका उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, एसटी महामंडळाचे सहायक वाहतूक अधीक्षक चंद्रकांत खेमनर, शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब साठे, मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, शालेय वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय आव्हाड, वैभव आव्हाड, बाळासाहेब उबाळे, विक्रम कोरडे, लक्झरी बस संघटनेचे अध्यक्ष हनुमंत दारकुंडे आदी उपस्थित होते.

शालेय मुलांची ने-आण करणाऱया सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसविणे आणि सहा वर्षांखालील मुलांसाठी महिला कर्मचाऱयांची नियुक्ती बंधनकारक आहे. या स्कूल बस आणि व्हॅनचालक तसेच क्लीनर व महिला सहायक यांची पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी आवश्यक आहे. तसेच स्कूल बस शाळांच्या पार्ंकगमध्येच उभ्या कराव्यात. रस्त्यांवर धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची चढ-उतार करू नये. याबाबत शालेय व्यवस्थापनाने जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, असे निर्देशही पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिले.