
सामना प्रतिनिधी । जम्मू
पाकड्यांकडून शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन सुरूच आहे. बुधवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ट्रेड सेंटरवरच पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. त्यामुळे ‘एलओसी’वरील हिंदुस्थान-पाकिस्तानमधील व्यापार बंद करण्यात आला आहे.
हिंदुस्थानी हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक’ केल्यापासून पाकड्यांकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. आज दुपारी 12.30 वाजता पाकिस्तानने पुंछमध्ये शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करून चक्का दा बाग येथील ट्रेड सेंटर या व्यापार केंद्रावर शेल्सचा मारा केला. यात जीवितहानी झालेली नाही. गोळीबारामुळे व्यापाऱ्यामध्ये घबराट पसरली. कृष्णा घाटी सेक्टरमध्येही पाकने गोळीबार केला. दरम्यान, पाकड्यांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्कराकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांमधील व्यापार बंद करण्यात आला आहे. याआधी पुलवामा हल्ल्यानंतर व्यापार बंद ठेवला होता. काही दिवसांपूर्वी व्यापार सुरू केला; पण पाकड्यांच्या कुरापतीमुळे पुन्हा बंद केला आहे.



























































