
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पटना येथे पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी शनिवारी पटना येथील ताज हॉटेलमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या विविध मुद्दांवर चर्चा झाली. ज्ञानेश कुमार यांनी बिहारमधील ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) अर्थात विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया यशस्वी झाल्याचं म्हणत, ती देशभर राबवण्याची घोषणा केली. तसेच मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंग करण्यात येईल, असे ते म्हणाले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावेळी बोलताना म्हणाले की, “मतदारांना भेटताना बीएलओंना त्यांची ओळख पटविण्यासाठी स्मार्ट ओळखपत्रे देण्यात आले आहेत. आता मतदान केंद्राबाहेर मोबाईल फोन ठेवून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
ते म्हणाले, “देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर आता १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. शिवाय बिहारमध्ये पहिल्यांदाच वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जात आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी टेबल आता मतदान केंद्रांपासून १०० मीटर अंतरावर ठेवण्याची परवानगी असेल, जी पूर्वीची १५० मीटर होती.”