गणेशोत्सव शांतता, उत्साहात व पर्यावरणपूरक साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांचे आवाहन

आगामी गणेशोत्सव व अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्व स्तरातील समाजघटकांनी सौहार्दपणे सहभागी होऊन शांतता व उत्साह तसेच पर्यावरणपूरक साजरा करावा, त्याचबरोबर समाजात सलोखा, बंधुभाव वाढविण्यासाठी गणेश मंडळांनी विशेष उपक्रम राबवावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील पोलीस संकुलात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, मिलिंद पाटील, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, सहायक पोलीस निरीक्षक भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, महावितरणचे होनमाने तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले म्हणाले, ‘पंढरपूर तालुक्यात 434 गणेश मंडळे असून, पंढरपूर शहरात 144, तर ग्रामीण भागात 290 गणेश मंडळे आहेत. पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वच समाजाचे सण, उत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व जातीय सलोखा अबाधित ठेवतात अशी या तालुक्याची परंपरा आह़े हीच परंपरा कायम ठेवून, गणेशोत्सव तसेच अन्य आगामी सण-उत्सव साजरे करावेत. यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी साजरे होत आहे. परंतु, श्री गणेश विसर्जनाच्या दुसऱया दिवशी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याबाबत पंढरपूर येथील मुस्लिम बांधवांनी सकारात्मकता दर्शविली आहे. तसेच ग्प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच गणेश विसर्जन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. पारंपरिक वाद्याला गणेश मंडळांनी प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांचा मंडप व विसर्जन मिरवणुकीतील देखावा हा रहदारीस अडथळा करणारा नसावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा पाळावी, तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत. गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. गणेशोत्सव शांतता व सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी केले.

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव पारंपरिक व साधेपणाने साजरा करावा. मंडळांनी वर्गणी जमा करताना ऐच्छिक स्वरूपातच जमा करावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 
– सुशील बेल्हेकर, तहसीलदार, पंढरपूर