पारंपरिक सण नावीन्याने करा साजरे

पारंपरिक कपडे हे आपली संस्कृती आणि ओळख दर्शवतात आणि म्हणूनच आपल्या परंपरांचे जतन करायचे असल्यास त्यांना धरून ठेवणेही महत्त्वाचे आहे.

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपली परंपरा पोहोचविण्याचे काम पोशाख व आपल्या काही पारंपरिक गोष्टी करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिले आहे. तसेच त्यावर घातल्या जाणाऱ्या दागिन्यांचा साज व त्याच प्रकारे चेहऱ्यावरील मेकअप या सगळय़ा गोष्टी एकत्रित करीत आनंद देतानाच उत्साह वाढवत असतात.

देशातील अनेक राज्यांतून बनवलेले कापड, विणकाम प्रक्रिया, अलंकार शैली ही आपली परंपरा दर्शवते. पाश्चात्य पोशाखांव्यतिरिक्त आपले धोती, कुर्ता, शेरवानी, पगडी, साडी, फेटा, परकर-पोलका, घागरा- चोली हे परंपरेनुसार
चालत आलेले पोशाख आहेत. देशातील बहुतेक स्त्रिया साडय़ा परिधान करतात, परंतु हिंदुस्थानच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये साडी नेसण्याची शैली बदलते आणि हा फरक केवळ वेगवेगळय़ा राज्यांमध्येच नाही तर एकाच राज्यातील विविध समुदायांमध्येदेखील दिसून येतो. त्यामुळेच वेगवेगळय़ा पद्धतीचे फेटे, टोप्या, साडय़ा यांचे नावीन्य आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातूनच आपली संस्कृती जपण्याचा आनंदही घेता येतो.

हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिना म्हणजे खास आहे. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, मंगळागौर, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला यांसारखे सण येतात. श्रावणानंतर येणारा भाद्रपद. घराघरांत श्री गणेशाचे आगमन होते आणि मग सांस्कृतिक परंपरा जपतानाच त्यात नावीन्य आणून पेहराव, त्यावरील घातले जाणारे दागदागिने, त्यालाच अनुसरून असा मेकअप करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या संस्कृतीचा पुरेपूर आनंद लुटतात.

आपली परंपरा जपतानाच, नावीन्याचा शोध घेतानाच आपण परंपरेनुसार ज्या साडय़ा नेसत असतो, त्याच साडय़ा आता वेगवेगळय़ा प्रकारे नेसल्या जातात. नऊवारी साडी पूर्वी काष्टा, ब्राह्मणी, तमाशा या प्रकारांत नेसली जायची. ती आता वैविध्यपूर्ण प्रकारांत नेसली जाते. मात्र त्याबरोबर घातले जाणारे दागदागिने हे मात्र परंपरेनुसार चालत आलेलेच घातले जातात. जसे की ठुशी, मोहनमाळ, तन्मणी, कानात झुमके किंवा कुडय़ा यांचा वापर केला जातो, तर काही वेळा त्यामध्ये नावीन्याचा शोध घेऊन त्यांचाही वापर केला जातो. या अशा पारंपरिक पेहरावावर मेकअप करताना आपल्या चेहऱ्याला सूटेबल असे फाऊंडेशन घेऊन ते संपूर्ण चेहऱ्यावर पसरल्यानंतर त्यावर त्याच रंगाची पावडर लावावी. हलकासा रुज व साडीच्या रंगाचा आयशॅडो करून साडीच्या रंगाची लिपस्टिक लावावी. कपाळावर सूट होईल अशी चंद्रकोर लावावी. चंद्रकोर ही सोन्यामध्येही मिळते. पुरुषांच्या कुर्त्यांमध्ये पूर्वी साधे कुर्ते घातले जायचे. त्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारच्या डिझाइन्स तसेच विविध प्रकारच्या कपडय़ांमध्ये हे कुर्ते उपलब्ध होऊ लागले, तर अलीकडे त्याला भरतकाम, विणकाम, जरी यांचीही जोड मिळू लागली. अनेक साडय़ांच्याच कपडय़ांपासूनही हे कुर्ते किंवा त्यावर घातले जाणारे जॅकेट तयार होऊ लागले.

धोती हा आपला पारंपरिक पोशाख आहे. पूर्वी ही धोती बांधली किंवा नेसवली जायची. आता लेस, जरी तसेच सिल्कच्या कपडय़ातही धोती मिळते.

पुढील भागात आपण आपली ही संस्कृती जपतानाच विविध प्रकारचे दागदागिने, विविध प्रकारचे पोशाख तसेच त्यावर केला जाणारा मेकअप या पोशाखातूनच अनेक निर्माण होणाऱ्या गोष्टी यांचा लेखाजोखा आपण पुढील लेखांमध्ये घेऊ या.
– शिवानी गोंडाळ
(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]