
मजबूत, टिकावू, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी यापुढे सहा फुटांवरील सर्व रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डांबराचे रस्त्यावर बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपका&मुळे नियमितपणे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे असे धोरण आखण्यात आल्याची माहिती रस्ते, पूल, वाहतूक प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांनी दिली.
पालिकेचे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यात साधारण पाच हजार रस्ते आहेत. त्यातील 300 रस्त्यांची दुरुस्ती येत्या काळात होणार असून सुमारे एक हजार रस्त्यांची दुरुस्ती झाली असून हे रस्ते हमी कालावधीत आहेत. प्रामुख्याने डांबराच्या रस्त्यावर खड्डे होत असल्याने पालिकेने सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या मार्गावर बेस्ट बसेस धावत होत्या त्या रस्त्यांचे प्रामुख्याने काँक्रीटीकरण करण्यात येत होते. मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे. आता सहा मीटरवरील प्रत्येक रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत हा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.
अशी होतेय कार्यवाही
पालिका प्रशासनाने दिनांक 9 एप्रिल ते दिनांक 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण 31 हजार 398 खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 1 लाख 56 हजार 910 चौरस मीटर इतके होते.
प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित 50 लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.
पालिकेने 31 हजार खड्डे बुजवले!
मुंबईकरांना रस्त्यावरील खड्डय़ांचा त्रास होऊ नये यासाठी पालिकेचा रस्ते विभाग आणि वॉर्ड ऑफिस, पंत्राटदारांच्या माध्यमातून अहोरात्र खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल 30 हजार 780 खड्डे बुजवण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीतही सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. रस्ते, पूल, वाहतूक प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांनी ही माहिती दिली.

























































