
ओमायक्रोनच्या शिरकावामुळे देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेची भिती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारात प्रभावी ठरलेल्या 8 औषधांचा पुरेसा साठा करून ठेवा, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना केली आहे.
देशातील काही राज्यांत कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग अधूनमधून डोके वर काढत आहे. त्यात हा नवा व्हेरिएंट धडकल्याने विषाणूची तिसरी लाट येण्याची भिती वाढली आहे. या अनुषंगाने तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गुरुवारी नव्याने सूचना दिल्या. राज्य सरकारांनी रुग्णालयांमध्ये कोरोनावर प्रभावी ठरलेल्या 8 आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच कोरोनाची रुग्णवाढ वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला रुग्णालयांना दिला आहे.
आरोग्य सचिवांनी घेतला लसीकरणाचा आढावा
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील लसीकरण मोहिमांचा आढावा घेतला. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये क्हेंटिलेटर, ऑक्सीजन कन्संट्रेटर आणि प्लान्ट कार्यान्वित असले पाहिजेत, अशी सूचना भूषण यांनी राज्यांच्या आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या संचालकांना दिली आहे.



























































