
सरकारी नियम आणि आदेशांचे पालन करा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा, असा निर्वाणीचा इशारा देत केंद्र सरकारने ट्विटरला 4 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. याआधी देण्यात आलेल्या सर्व सरकारी आदेशांचे 4 जुलैपर्यंत पालन करण्याबाबत ट्विटरला बजावण्यात आले आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला ही अंतिम मुदत दिली आहे. ट्विटरने याआधी हिंदुस्थानातील विविध कायदे धाब्यावर बसवले आहेत. याच कारणावरून ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट सरकारच्या रडारवर आली आहे. जूनच्या सुरुवातीलाही ट्विटरला नियम, कायदे पाळण्याबाबत तसेच वादग्रस्त मजकूर हटवण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्या नोटीशीलाही ट्विटरने जुमानले नाही.
त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाने नव्याने नोटीस जारी करून ट्विटरला 4 जुलैचा अल्टीमेटम दिला आहे. नियम, सरकारी आदेश न पाळल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा ट्विटरला देण्यात आला आहे.






























































