शुक्रवारपासून मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर दरम्यान धावणार ट्रेन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हळूहळू जगणं रुळावर येतंय… कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली लांबपल्ल्याची वाहतूक आता पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. मध्य रेल्वेने मुंबई ते पुणे, नागपूर, सोलापूर आणि गोंदिया अशा पाच इंटरसिटी स्पेशल आरक्षित गाड्या 9 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सणासुदीच्या दिवसातील वाढती मागणी पाहून गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली प्रायव्हेट ट्रेन तेजस 17 ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार आहे. या ट्रेनची वाहतूक 19 मार्चपासून बंद करण्यात आली होती. मुंबई ते अहमदाबाद आणि लखनऊ ते नवी दिल्ली तेजस एक्प्रेस पुन्हा धावणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ट्रेनमध्य प्रत्येक प्रवाशानंतर एक सीट रिकामी ठेवण्यात येणार आहे. तसेच आयआरसीटीसीने कर्मचाऱयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खास प्रशिक्षण दिले आहे. प्रवाशांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे तापमान तपासले जाणार आहे.

महाराष्ट्रात या पाच इंटरसिटी धावणार
– ट्रेन क्र. 02189 मुंबई-नागपूर दुरांतो 10 ऑक्टोबरपासून सीएसएमटीतून दररोज रा.8.15 वा. सुटेल.
– ट्रेन क्र.02123 मुंबई-पुणे सुपरफास्ट स्पेशल डेली 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज सायं.5.10वा. सुटेल.
– ट्रेन क्र.02015 मुंबई-पुणे सुपरफास्ट स्पेशल डेली 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज स.5.40वा. सुटेल.
– ट्रेन क्र. 02105 मुंबई-गोंदिया सुपरफास्ट स्पेशल डेली 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज सायं.7.10वा. सुटून गोंदियाला दुसऱया दिवशी स.11.10 वा. पोहचेल.
– ट्रेन क्र.02115 मुंबई-सोलापूर सुपरफास्ट स्पेशल 9 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज रा.10.45वा. सुटेल.

रेस्टॉरंटस्, बार सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
महाराष्ट्रातील हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि बार सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर. यासाठी पर्यटन संचालनालयाकडून वेळही निश्चित करण्यात आली आहे. रेस्टॉरंटस आणि बारना सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पर्यटन संचालनालयाने दिली आहे. या वेळेत बदल करण्याचा अधिकार येथील महापालिकांना देण्यात आला आहे.

खासगी बसेसना शंभर टक्के वाहतुकीची परवानगी
राज्यातील एसटी बसेस शंभर टक्के क्षमतेने चालू असताना आता खाजगी वाहतूक बसेस आणि पर्यटक वाहतूकीलाही शंभर टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परिवहन विभागाने मंजूरी दिली आहे.
नियमावली
– मास्क नसेल तर प्रवाशाला प्रवेश बंदी
-प्रत्येकी फेरीनंतर बस निर्जंतूक करणे
– प्रवाशाची थर्मल गनने तपासणी होणार
– स्वच्छ उपाहारगृहे, प्रसाधनगृहे असेल तरच थांबा