मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा मशीन कोसळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या एका तंत्रज्ञावर बोगींची दुरुस्ती करत असताना अंगावर अवजड मशीन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी परळ वर्कशॉपमध्ये घडली आहे. सुर्यकांत वाघ असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन वर्षांचा मुलगा आहे.

परळ रेल्वे वर्कशॉपच्या मशिन कारशेडमध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजता सुर्यकांत वाघ व इतर चार कर्मचारी बोगींच्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी तब्बल 20 टन वजनाच्या बोगी हलविण्याची ताकद असलेल्या मशीनवर ते काम करत होते. काम करत असताना अचानक ती मशीन बोगीपासून वेगळी झाली वाघ यांच्या अंगावर पडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ भायखळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या अपघातानंतर रेल्वे युनियनने कामाच्या ठिकाणी वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी केलीआहे. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून जुनी मशीन हटवून त्या ठिकाणी नवी मशीन बसविण्यास सांगितले आहे.