‘कवच’ प्रणालीमुळे रेल्वेची धडक टळणार, मध्य रेल्वेने रचला इतिहास; लोको चाचण्या केल्या पूर्ण

रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ‘कवच’ प्रणालीमुळे रेल्वेची समोरासमोर किंवा मागून धडक बसण्याचा धोका टाळणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात ‘कवच’ प्रणालीच्या लोको चाचण्या पूर्ण केल्या आहेत. सर्व पाच विभागांमध्ये काम मंजूर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ‘कवच’ कार्यान्वित करण्याबाबत मध्य रेल्वेने इतिहास रचला आहे. महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी रविवारी मुंबई विभागात स्वदेशी ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको चाचणीचे नेतृत्व केले.

पनवेल-रोहा मार्गावरील सोमटणे, आपटा आणि जीते स्थानकांवर लोको चाचणी यशस्वी करण्यात आली. यंदा मार्च महिन्यात मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाच विभागांमध्ये ‘कवच’ उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मंजूर केली. त्यानंतर ‘कवच’ प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम ‘मिशन मोड’मध्ये हाती घेण्यात आले. संपूर्ण रेल्वे नेटवर्कसाठी सविस्तर रेडिओ आणि लिडार आधारित सर्वेक्षण करण्यात आले, तांत्रिक योजना व आराखडे जलदगतीने मंजूर करण्यात आले. सर्व पाच विभागांवर चाचणी, नेटवर्क मॉनिटरिंग आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचे काम करण्यात आले. अशा प्रकारे ‘कवच’ प्रणालीच्या अंमलबजावणीला वेग देऊन अखेर मध्य रेल्वेने लोको चाचण्या पूर्ण करण्यात यश मिळवले.

कवचची वैशिष्टय़े

z ‘कवच प्रणाली’ भारतीय रेल्वेची महत्त्वाकांक्षी योजना असून सुरक्षितता वाढविणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. ही स्वदेशी ‘ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन’ प्रणाली आहे. z रेल्वे कर्मचारी वेळेत गाडी थांबवण्यात अपयशी ठरल्यास ही प्रणाली धडक होण्यापासून (समोरासमोर किंवा मागून) वाचवू शकते. तसेच जर लोको पायलटने लाल सिग्नल असताना गती कमी केली नाही, तर ही प्रणाली आपोआप ब्रेक लावते. z सिग्नलची माहिती, गतिमर्यादा यांचे ऑनबोर्ड डिस्प्ले, लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिट्टी वाजवणे, गतीमर्यादित ठिकाणी गाडीचा वेग नियंत्रित करणे आदी ‘कवच’ प्रणालीची वैशिष्टय़े आहेत.

730 इंजिनमध्ये कवचबसवणार

रेल्वे बोर्डाने पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेतील 730 इंजिनांमध्ये कवच बसविण्यास मान्यता दिली आहे. हे काम मध्य रेल्वेच्या सर्व लोको शेड्समध्ये सुरू आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सर्व इंजिनांना अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली उपलब्ध होणार आहे. यादृष्टीने आतापर्यंत मध्य रेल्वेतील सुमारे 3000 अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘कवच’ प्रणाली हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.