मध्य रेल्वेचे ऑपरेशन नन्हे फरिश्ते; भरकटलेल्या 858 मुलांना दाखवला घरचा रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातील वडीलधाऱयांशी वाद झाल्याने भरकटलेल्या मुलांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ सुरू केले आहे. त्याला चांगले यश आले असून गेल्या आठ महिन्यांत आरपीएफने तब्बल 858 मुलांना घरचा रस्ता दाखवत त्यांच्या पालकांकडे सोपवले आहे. यामध्ये 591 मुले आणि 236 मुलींचा समावेश आहे. यासाठी आरपीएफने स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे.

रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत हरवलेल्या किंवा घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी काम करत आहे. देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील दाखल झालेली ही मुले रेल्वे स्थानकांवर आरपीएफ कर्मचाऱयांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत आरपीएफ पोलिसांनी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवरील 858 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबई विभागातून 252 मुलांना घरी पाठवले आहे. भुसावळ विभागातून 238, पुणे विभाग 206, नागपूर विभाग 111, सोलापूर विभागातून 51 मुलांना यशस्वीपणे घरी पोहोचवले आहे.