
कसारा – कल्याण मार्गावर टिटवाळा-खडवली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने होणारी वाहतूक ठप्प आहे. अर्ध्यातासापासून वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम सुरू असल्यामुळे कसारा-कल्याण दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, लोकल तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या वासिंद, आसनगाव, टिटवाळा स्थानकात उभ्या करण्यात आल्या आहेत. अर्धा ते पाऊणतासात बिघाड दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

























































