
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेची रडारड सुरुच असून भायखळा रेल्वे स्थानकाजवळ अप दिशेच्या स्लो लोकलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या स्लो लोकल जलद मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. या वाहतूक विस्कळीततेचा परिणाम डाऊन स्लो सेवेवरही झाला आहे. डाऊन स्लो सेवेवरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या वाहतूक विस्कळीततेमुळे प्रवाशांना प्रचंड ताण सहन करावा लागत आहे.
प्रवाशांची पायपीट
दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले. लोकल एकाच जागी थांबून राहिल्याने काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारत पुढील स्टेशनवर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.






























































