
लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. यादृष्टीने लोकल प्रवास सुरक्षित करण्यावर रेल्वेने भर दिला असून स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकल चालवण्याच्या हालचालींना गती देण्यात आली आहे. अशा एका लोकलची कुर्ला कारशेडमध्ये चाचणी घेण्यात आली. त्याच्या निष्कर्षांचा अभ्यास करून लवकरच मध्य रेल्वेवर स्वयंचलित दरवाजाच्या साध्या लोकल सुरू केल्या जाणार आहेत.
जून महिन्यात मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनच्या खचाखच गर्दीमुळे पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वेला जाग आली आणि स्वयंचलित दरवाजाच्या लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये एका लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवून चाचणी घेतली. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नॉन-एसी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवल्यास आतील गर्दीमध्ये प्रवाशांची घुसमट होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्या अनुषंगाने स्वयंचलित दरवाजाच्या लोकल ट्रेनच्या रचनेचा चाचणीदरम्यान आढावा घेण्यात आला.
फेऱया वाढवण्याची प्रवाशांची मागणी
स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकल चालवल्यास प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल. मात्र नव्या रचनेच्या गाडय़ा सुरू करण्यापूर्वी मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱयांची संख्या वाढवण्यात यावी. फेऱया न वाढवल्यास गाड्यांमध्ये गर्दी ‘जैसे थे’ राहून प्रवासी गुदमरण्याचा धोका निर्माण होईल, अशी भीती कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केली, तर स्वयंचलित दरवाजे वेळीच बंद न झाल्यास मध्य रेल्वेच्या लोकल फेऱयांना आणखी विलंब होईल, अशी प्रतिक्रिया नियमित प्रवासी आकाश कोंडलेकर यांनी दिली.
- या चाचणीतील निष्कर्षांचा सर्वंकष विचार करून स्वयंचलित दरवाजाच्या लोकल प्रत्यक्षात प्रवासी सेवेत दाखल करण्याचा मुहूर्त निश्चित केला जाईल, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.