वाशी रेल्वे स्थानकात मिळणार एक रुपयात उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

एक रुपया खर्चात रुग्णांवर औषधोपचार करणारा वाशी रेल्वे स्थानक परिसरातील दवाखाना येत्या जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेला हा दवाखाना गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. आता तो नव्याने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे.

नवी मुंबईमध्ये प्रत्येक वर्षी सुमारे 250 जणांचा रेल्वे अपघातात बळी जातो. यापैकी काही जखमींना वेळेत औषधोपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता. मात्र एकाही स्थानकात दवाखान्याची सुविधा नसल्याने जखमींना वेळेत उपचार मिळाले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात एक रुपयात उपचार करणारा दवाखाना आणि तातडीची वैद्यकीय सेवा देणारा विभाग सुरू करण्यात यावा, असे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनाने पनवेल आणि वाशी रेल्वे स्थानकात एक रुपयात औषधोपचार करणारे दोन दवाखाने सुरू केले. मात्र व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळे वाशी रेल्वे स्थानकातील दवाखाना जुलै महिन्यात बंद झाला. वाशी रेल्वे स्थानकातील दवाखाना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.