खर्च वाढला, बचत घसरली!; पंधरा वर्षांतील नीचांक गाठला

338

अर्थव्यवस्थेतील मंदीचा परिणाम बचतीच्या आलेखावर झाला आहे. बचतीचा आलेख वर्षानुवर्षे उंचावला पाहिजे. पण तो गेली पंधरा वर्षे सतत घसरत आहे. यंदाच्या वर्षी तर त्याने नीचांक गाठला आहे. आरोग्य, शिक्षण सेवा महागल्याने देशातील नागरिकांना बचतीसाठी पैसा कमी पडू लागला आहे. घर चालवतानाच नाकीनऊ येऊ लागल्याने बचतीचे प्रमाण घसरले आहे.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने ही धक्कादायक आकडेवारी दिली आहे. देशात घरगुती बचतीचे प्रमाण मोठे आहे. देशात एकूण जी बचत होते त्यातील 60 टक्के बचत ही घरगुती असते. आर्थिक वृद्धी दर मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे पण खर्च वाढल्याने गुंतवणुकीसाठी पैसाच उरत नसल्याची सर्वसामान्यांची अवस्था झाली आहे.

2018-19 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानची एकूण बचत कमी होऊन देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजेच जीडीपीच्या 30.1 टक्क्यांवर आली. 2007-08 मध्ये हे प्रमाण 36 टक्के आणि 2011-12 मध्ये 34.6 टक्के होते. जीडीपीची आकडेवारी पाहिली तर 2011-12 मध्ये देशांतर्गत बचत 23 टक्के होती. ती मागील आर्थिक वर्षात 18 टक्क्यांवर पोहोचली.

बचतीचे महत्त्व

अडीअडचणीला पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी आपण बचत करत असतो. सद्यस्थितीत खासगी क्षेत्रात काम करणाऱया नागरिकांच्या नोकरीचा काहीच भरवसा नसतो. कंपनी अचानक बंद झाली तर त्या परिस्थितीत ही बचतच मदतीला येते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेतही बचतीला फार महत्व असते. गुंतवणूकीमध्ये सातत्य राहिले तर अर्थव्यवस्थेचा आलेखही उंचावत राहतो. या गुंतवणुकीतून सरकारला निधी पुरवठा होत असतो.

बचत कमी झाल्याने परदेशी कर्जाचा डोंगर वाढला

देशांतर्गत बचत चांगली असेल तर परकीय गुंतवणुकीची अधिक गरज भासत नाही. पण देशांतर्गत बचतीचे प्रमाण घसरल्याने हिंदुस्थानी कंपन्यांना परदेशांकडे लक्ष केंद्रीत करावे लागते. त्यामुळे परदेशी कर्जाचा डोंगर वाढत जातो. 2014-15 मध्ये 475 अब्ज डॉलर्स इतके परदेशी कर्ज देशावर होते. तो आकडा 2018-19 मध्ये 543 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. बचतीचे प्रमाण घसरल्याने सरकारलाही परदेशांकडून गुंतवणूक वाढवण्यावर भर द्यावा लागत असल्याचे अर्थतज्ञ सांगतात.

सोने @ 42492

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचा दर घसरल्याने आज सराफा बाजारात सोने वधारले. सोन्याच्या दरात तोळय़ामागे 111 रुपयांनी वाढ झाली. एक तोळा सोन्याची किंमत 42492 रुपये झाली. सोन्याचा दर बुधवारी 10 ग्रॅमला 42381 रुपये होता. लग्नसराईचा हंगामही सोने वधारण्यास कारणीभूत आहे. चांदीच्या दरात मात्र घसरण झाली. चांदीचा दर किलोमागे 48666 रुपयांवरून 48599 रुपये झाला.

प्रमाण का घसरले?

बचतीचे प्रमाण घसरण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. मंदावलेली अर्थव्यवस्था हे प्रमुख कारण आहे. बरोबरच खरेदीचे प्रमाण वाढल्याने बचतीचे प्रमाण घसरले आहे. आरोग्य सेवा तसेच शिक्षण महागल्याने लोकांचा त्यावर पूर्वीपेक्षा जास्त खर्च होऊ लागला आहे. प्रवासावर होणाऱया खर्चामध्येही वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या