घाटकोपर येथील होर्डिंग्ज दुर्घटनेला मध्य रेल्वे जबाबदार; गुन्हा दाखल करण्याची आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची मागणी

वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपर येथील एक मोठे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. तर 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मध्य रेल्वेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. तसेच एवढे मोठे होर्डिंग कसे लावण्यात आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मध्य रेल्वे घाटकोपर पूर्व येथील रेल्वे आवारातील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असून गुजराती मालकीच्या जाहिरात कंपनीसह गुन्हा दाखल करावा. 120×120 फूट एवढ्या आकाराचे प्रचंड होर्डिंग्ज लावण्यात आले होते. तर महापालिकेकडून फक्त 40×40 फूट आकाराच्या होर्डिंगला अनुमती देण्यात येते. तरीही एवढे मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज का लावण्यात आले होते, असा सवालही गलगली यांनी केला आहे.

मुंबईतील घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपासमोर असलेले 100 फुटांचे होर्डिंग वादळाच्या तडाख्याने कोसळले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जमिनीवर पडण्यापूर्वी अनेक गाड्यांचे छत फोडून होर्डिंग जमिनीवर आदळल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या पोलीस गृहनिर्माण विभागाने पोलीस कल्याण महामंडळाला भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडावर इगो मीडियाने हे होर्डिंग उभारले होते. आवारात इगो मीडियाचे चार होर्डिंग आहेत. त्यापैकी एक सोमवारी संध्याकाळी कोसळले. मुंबई पोलिसांनी इगो मीडियाच्या मालकासह या घटनेशीसंबंधितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (रेल्वे) यांनी पडलेल्या चारही होर्डिंगसह ईगो मीडियाला परवानगी दिली असली तरी, स्थापनेपूर्वी बीएमसीकडून कोणतेही अधिकृतता किंवा ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतले गेले नाही. त्यामुळे बीएमसीने रेल्वे पोलिसांचे एसीपी आणि रेल्वे आयुक्तांना नोटीस बजावून रेल्वेने दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्याची आणि होर्डिंग्ज हटवण्याची मागणी केली आहे.