मुले पळविण्याच्या अफवांना पायबंद घाला, केंद्राचे राज्यांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मुले पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या अफवा सोशल साईटस्वरून फैलावल्यानंतर संशयातून जमावाकडून घडू लागलेल्या हत्या रोखण्यासाठी सतर्क राहावे, असा आदेश केंद्र सरकारने आज राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला.

मुले पळवण्याच्या अफवेमुळे गेल्या दोन महिन्यांत संशयातून जमावाकडून झालेल्या मारहाणीत २० जणांचा बळी गेला आहे. त्यात महाराष्ट्राच्या धुळे जिह्यातील राईनपाडा या गावातील भरबाजारात जमावाने केलेल्या पाच हत्यांची घटना ताजी आहे.

मुले पळविण्याच्या अफवांचा उगम कुठून होतो, त्या कोण पसरवतोय यावर करडी नजर ठेवून त्याला तत्काळ पायबंद घालावा, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. बेजबाबदार आणि खळबळ माजवणारे ‘संदेश’ फैलावले जाण्यास अटकाव करावा, असे आदेश केंद्र सरकारने व्हॉटस्ऍपला मंगळवारीच दिले होते. त्यापाठोपाठ राज्यांची सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनाही सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

– २८ जून रोजी त्रिपुरात मुले पळवण्याच्या संशयातून दोनजणांची हत्या करण्यात आली.
– गेल्या महिन्यात आसामात मुले पळविण्याच्या संशयातूनच दोनजणांची हत्या केली गेली.

मुले बेपत्ता होण्याच्या वा त्यांच्या अपहरणाच्या तक्रारींचा पोलिसांनी गंभीरपणे सर्वतोपरी तपास करावा. जनतेचा विश्वास संपादन करावा. तसेच लोकांनी अफवांना बळी पडू नये यासाठी जागृती करण्यात यावी.
– केंद्रीय गृहमंत्रालय

नागपूरमध्ये महिलेस जमावाने बदडले
मुले पळविणाऱया अफवेचे लोण नागपुरात पोहचले आहे. जिह्यातील पारशिवनी तालुक्यात कुरंभाड गावात आलेली एक महिला ही पोरे चोरून नेणारी आहे या संशयावरून गावातील जमावाने तिला बदडून काढले. या ठिकाणी पोलीस वेळीच दाखल झाल्याने जयश्री रामटेके (रा. नागपूर, हुडको कॉलनी) या बचावल्या. वात, गुडघेदुखी व हाडांच्या आजारावर आयुर्वेदिक मालीशच्या तेलविक्रीचा या महिलेचा व्यवसाय आहे.