महिलेच्या डोक्यात दगड मारून दागिने हिसकावण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांची दहशत वाढली असून पादचारी महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. लोहगाव भागात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून तिचे दागिने दागिने हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची घटना घडली आहे. तर बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात पादचारी महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव भागातील निंबाळकरनगर परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तक्रारदार महिला घराजवळील दुकानातून दूध घेऊन निघाली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना धक्का दिला. त्यामुळे महिला रस्त्यात पडली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या डोक्यात दगड मारून तिचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. घटनेत महिलेच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी तिने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. गिरी तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानाजवळ सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचे 30 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बोबडे तपास करत आहेत. शहरात गेल्या महिन्याभरापासून महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.