
पंढरपूर यात्रेतील कडक सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी मंदिरात वाण देण्यासाठी आलेल्या पाच महिलांच्या गळ्यातील तब्बल सहा तोळ्यांचे दागिने लुटल्याची संतापजनक घटना बुधवारी दुपारी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात घडली. ही माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेल्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सर्वसामान्य नागरिकांपाठोपाठ आता मंदिरेही सुरक्षित नसल्याचे उघड होत आहे.
शहरात चोरी व घरफोडी रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा घेत चोरटे दररोज पोलिसांना आव्हान देत असल्याचे उघड होत आहे. पोलीस अपयशी ठरत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिन्यांत तब्बल १७ ठिकाणी घरफोड्या केल्या तर अनेक ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र हिसकावलेले आहेत. चोरीचा तसेच घरफोडीचा गुन्हा उघड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली गुन्हे शाखाही गार झाली आहे. शहरात गुन्हे शाखेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त छोटा पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आज बुधवारी दर्शनासाठी हजारो भविकांनी गर्दी केली होती. यासाठी पोलीस दलातर्पेâ मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात वाण देण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीतील शीतल मोरे यांचे साडेतीन तोळ्याचे गंठण, अंबुबाई गाडेकर यांचे साडेपाच ग्रॅमचे मंगळसूत्र, एकवर्षीय बालकाच्या गळ्यातील एक ग्रॅमचा ओम, भागुबाई भालेराव यांचे एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि सुमन गायकवाड यांचे एक तोळ्याचे मंगळसूत्र लुटून पळ काढला.
दर्शन आटोपून महिला बाहेर आल्या असता त्यांना गळ्यातील गंठण आणि मंगळसूत्र लुटल्याचे दिसले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या साक्षीने ‘लुटले’
यात्रेनिमित्त परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तावरील पोलिसांनाही न जुमानता चोरट्यांनी पाच महिलांच्या गळ्यातील सहा तोळ्याचे दागिने ‘लुटले’. घटना उघड होताच पोलिसांनी तात्काळ मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केल्याचे सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले.






























































