
>> चैताली कानिटकर
उत्तराखंडमधील प्रसिद्ध हर की दून ट्रेक एकदा तरी करायलाच हवा असा. हिमालयातील ही भ्रमंती प्रत्येक पावलावर नवं काहीतरी शिकवणारी आणि चैतन्य जागवणारी ठरली.
मळवाटेचा ट्रेक असं ज्या ट्रेकला म्हणता येईल तो ट्रेक आहे उत्तराखंडमधील प्रसिद्ध हर की दून ट्रेक.
सलग तीन ट्रेक केल्यानंतर गढवाल हिमालयातील हर की दून हाच ट्रेक करायचं आम्ही ठरवलं. हा ट्रेक जरा जास्त दिवसांचा आहे. त्यामुळे हातात 9-10 दिवस हवेतच. आम्ही हा ट्रेक केला जूनच्या पहिल्या आठवडय़ात. मार्च ते जून आणि सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये हा ट्रेक करता येतो. फक्त हा पहिलाच ट्रेक असेल तर पूर्वतयारीसाठी तीन-चार महिने द्यावे लागतात. 21000 फूट उंचीवर असलेल्या या ट्रेकमध्ये आठ दिवसांत 43 किमी अंतर कापावे लागते. उत्तराखंडला पोहचल्यावर सकाळी निघून आपण पोहचतो 210 किमीवर असलेल्या बेस कॅम्प सांक्री या गावात. हे अंतर प्रचंड जास्त आणि वळणावळणाचं असल्याने कंटाळा येतो, पण पुढे वाटेवर नैनिताल, मसुरी इथली लोभसवाणा नजारा, हिमाच्छादित शिखरे तुमच्या सोबत राहतात. सांक्री गाव गोविंद वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. त्यामुळे इथलं निसर्गरम्य वातावरण भारावून टाकतं.
दुसऱ्याच दिवशी सकाळी सांक्री ते सांक्री बेस पुन्हा गाडीने प्रवास होता आणि मग सुरू झाला ट्रेक. चिरूरगाड गावापर्यंत फक्त 15 -16 किमी अंतर आहे. हिरव्यागार कुरणांवर हलकी चढण चढत नदीकिनारी असलेल्या कॅम्प्सला आम्ही पोहचलो. नदीजवळ ही कॅम्पसाईट असल्याने पाण्याचा खळखळाट आपली सोबत करतो. इथे मस्तपैकी संध्याकाळचा ब्रेकफास्ट करून थोडा वेळ फिरून रात्रीचे जेऊन दुसऱया दिवसासाठी स्वतला आम्ही तयार केले. ऑक्सिजन लेव्हल, ब्लडप्रेशर वगैरे तपासले. आमच्या ट्रेक लिडरने पुढील दिवसांचा तपशील दिला. या वेळेस आमची ग्रुपलिडर होती आस्था मॅडम. गंगाडला जाताना आमच्या फिटनेसचा कस लागत होता पण मध्ये मध्ये लागणारे ढाबे, तिथला चहा, कॉफी, रेरेडेंड्रॉन फुलांचे सरबत मन प्रफुल्लित करणारे होते.
पुढच्या दिवशी सिमात्रा हे कॅम्पसाईटचे गाव होते. वाटेत जाताना एक मोठ्ठा ब्रीज, पुरातन मंदिरे लागली पण ट्रेक लिडरच्या सूचनेनुसार आम्ही समीट करून परत येताना ती पाहणार होतो. सिमात्रा कॅम्पसाईटला पोहोचतानासुद्धा थोडी दमछाक होतेच. पण वाटेत दिसणाऱया, पर्वतातून वाहणाऱया पारदर्शक नद्या, कुरणावर चरणाऱ्या मेंढ्य़ा, गाई, खेचरे, गावातील छोटी छोटी पहाडी मुलं हे सारं सुखावणारं होतं. या कॅम्पसाईटला आम्हाला प्रचंड पाऊस लागला. थंडीही प्रचंड होती. ओले शूज सुकले नाहीत. शिवाय थंडीमुळे टेन्टबाहेरही पडता येत नव्हते. पण नंतर मात्र चांदण्यांनी भरलेले आभाळ, धुक्यातली रात्र पाहण्याचा अद्भुत आनंद मिळाला. थंडीपासून आपले रक्षण करायला योग्य ती काळजी आपण घ्यायलाच हवी. त्याच दिवशी रात्री माझ्याच बहिणीला थंडी प्रचंड भरली आणि हिमालयातील थंडीचा अंदाज आला. दुसऱया दिवशी समीट होतं, त्यामुळे लवकर उठावे लागले. अगदी अर्धा तास सूर्यदर्शन झालं आणि इतका आनंद झाला की विचारून सोय नाही. शूज, कपडे वाळले. या कॅम्पसाईटवर आम्ही परत रात्री येणार होतो. त्यामुळेच फारसे सामान बरोबर न घेता समीटला सुरूवात केली.
पाऊस, प्रचंड थंडी, बऱयापैकी चढण करत करत सलग 4-5 तास चालल्यावर समीटला पोहोचलो. आजूबाजूचं निसर्गसौंदर्य जणू एखादं वॉलपेपर वा पेंटिंग असल्याचा भास होत होता. छानसी वाहणारी नदी, मागे व दोन्ही बाजूला पर्वत, जबरदस्त दणकट कुत्रे, भरपूर पक्षी, जंगली फळं विकणारे, लालबुंद गाल व गोरेपान पहाडी बांधव… अहाहा! मन प्रसन्न झालं. हृदयाच्या एका कप्प्यात हे दृश्य साठवून परतीच्या प्रवासाला लागलो.
समीटच्या दुसऱया दिवशी चढलेली चढण उतरायची होती. त्यामुळे जरा सोप्पं झालं आणि परत पोहोचलो गंगाडला. ही ट्रेकची शेवटची कॅम्प साईट होती. प्रत्येकाच्या चेहऱयावर समीट केल्याचा आनंद होताच आणि त्या आनंदात अजून भर पडली. ‘आज क्या है इव्हिनिंग स्नॅक्स?’ असे विचारताच ‘आज गोलगप्पे है’ असं ऐकलं, पण विश्वास बसेना. त्या दिवशी संध्याकाळी चक्क इतक्या जबरदस्त थंडीत आम्हाला ऊऊप् ने गरमागरम रगडा व पाणीपुरी दिली. सर्वांनी मिळून हिमालयात खाल्लेल्या त्या पाणीपुरीची चव आजही जिभेवर तरळते आहे. पाणी पुरीने पोट इतकं भरलं की रात्री जेवण स्कीप करून आम्ही माफिया, मेमरी असे खेळ खेळण्यात दंग झालो.
हिमालयात फिरताना प्रत्येक पावलावर आपण त्याच्याकडून काहीतरी शिकत राहतोच. ते सारं पदरी बाळगत आम्ही बेस कॅम्पला आलो. दुसऱया दिवशी उत्तराखंड व नंतर मुंबईत परतलो. हर की दून व त्याची धून आजही मनात गुंजते आहे.