चंद्रभागेच्या तीरी विठूचा गजर, चैत्री एकादशीला पुरणपोळीचा नैवेद्य

सामना प्रतिनिधी, पंढरपूर

आज चैत्री एकादशी, ही वारी पोहचती करण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून चंद्रभागेच्या तीरी तीन लाखांहून अधिक वारकरी भाविक दाखल झाल्याने विठुरायाची अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलीय. पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यामध्ये चैत्री वारीचा समावेश आहे. उन्हाचा कडाका आणि निवडणुकीचा माहोल असताना देखील विठ्ठल भक्तांनी वारीचा आनंद लुटण्यासाठी लक्षणीय गर्दी केली आहे. टाळ-मृदुंगाचा निनाद, आकाशाला गवसणी घालणारा ज्ञानबा-तुकारामाचा नामजप, डोलाने फडकणाऱ्या भगव्या पताका अशा सगळ्या वातावरणात वारकरी विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झालेले पाह्यला मिळाले.

एकादशीला पुरणपोळीचा नैवैद्य…
चैत्री एकादशीचा उपवास हा निरंकार किंव्हा साबूदाणा खिचडी खाऊन करीत असताना आज मात्र देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी महादेवाच्या विवाहा निमित्त विठूरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येत असल्याचे मानले जाते. तसेच पंधराव्या शतकात विजयनगर येथील राजा कृष्णदेवराय यांनी पंढरीतील मंदिरातून श्री विठ्ठलाची मूर्ती नेऊन आपल्या राज्यात मंदिर बांधून तेथे स्थापन केली होती. ही मूर्ती संत एकनाथ महाराज यांचे आजोब संत भानुदास महाराज यांनी पुन्हा पंढरीत आणली व एकाशीला तिची पुर्नस्थापना केली. यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्याचे मानले जाते.

दर्शन रांगेत थंडगार ताक…
पंढरपूरचे तापमान 40 अंशावर पोहचले आहे दर्शन रांगेत अनेक तास उभारणाऱ्या भाविकांना उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळाला यासाठी मंदिर समितीने प्रथमच थंडगार ताकाची व्यवस्था केली आहे. ताका बरोबर साबूदाणा खिचडी वाटप केली जात आहे. आज चैत्री एकादशी निमित्त केली जाणारी देवाची शासकीय महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे व भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्या माधवी निगडे आदी उपस्थित होते.