चाणक्य – मराठी रंगभूमीवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इ.स.पूर्व 320 च्या कालखंडात घडलेली एक गोष्ट ‘चाणक्य’ या नाटकाच्या माध्यमातून आता मराठी रंगभूमीवर येत आहे. रंगभूमीवर ‘चाणक्य’ ही व्यक्तिरेखा प्रत्यक्ष पाहणे हा रसिकांसाठी महत्त्वाचा अनुभव ठरणार आहे. अभिनेता शैलेश दातार या नाटकात ‘चाणक्य’ ही मध्यवर्ती भूमिका रंगवणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 19 ऑगस्ट रोजी दुपारी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणार आहे.

‘अभिजात क्रिएशन्स’ निर्मित व ‘मिलाप थिएटर्स’ प्रकाशित या नाटकाचे मूळ लेखक मिहीर भुता असून या नाटकाचा मराठी अनुवाद शैलेश दातार यांनी केला आहे. प्रणव जोशी हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.

शैलेश दातार यांच्यासह ज्ञानेश वाडेकर, ऋषिकेश शिंदे, नील केळकर, कृष्णा राजशेखर, प्रसाद माळी, संजना पाटील, हरिहर म्हैसकर, विक्रांत कोळपे, जितेंद्र आगरकर, रवींद्र कुलकर्णी, चैतन्य सरदेशपांडे आदी कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत.

एक नाटय़कृती म्हणून उदात्त विचार मांडणारा, रंगभूमीवरच्या सध्याच्या शैलीपेक्षा वेगळा आणि विषयापासून ते दृश्य संकल्पनेपर्यंत सगळ्याच बाबतीत भव्यदिव्य अनुभव देणारा असा हा प्रयोग आहे, अशा भावना यानिमित्ताने या नाटकाच्या चमूकडून व्यक्त होत आहेत.

गेल्या एक- दोन महिन्यांपासून रंगभूमीवर नवीन मराठी नाटकांची नांदी झाली आहे. यामध्ये आता ‘चाणक्य’ या नाटकाची भर पडली आहे.