यशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार

chanakya

आचार्य चाणक्य यांची ओळख एक कुशल राजकारणी, प्रकांड पंडित, अर्थशास्त्री, आदर्श गुरू म्हणून आहे. यशस्वी राजकारणासोबतच यशस्वी जीवनासाठी त्यांनी केलेलं मार्गदर्शन आजही लागू पडते. यशस्वी होण्यासाठी अनेकजण याच मार्गाचा अवलंब करतात. यासाठी त्यांनी 5 सूत्र सांगितली आहेत.

पहिलं सूत्र: वर्तमानस्थितीची जाण

आचार्य चाणाक्य म्हणतात की व्यक्तीने सतत या गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे की वर्तमान परिस्थिती कशी आहे. आपली सध्याची स्थिती लक्षात ठेवूनच कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. जर परिस्थिती चांगली असेल तर अधिकाधिक चांगली कामे करत राहणे, जोखीम स्वीकारणे योग्य ठरू शकतं. मात्र परिस्थिती यथातथा असेल तर संयम राखला पाहिजे. जोखीम न घेता पूर्ण विचारांती निर्णय घेतला पाहिजे.

दुसरं सूत्र: हितचिंतक ओळखा

व्यक्तीमध्ये कोण योग्य, कोण आप्त (आपला), कोण हितचिंतक हे ओळखण्याचा गुण असला पाहिजे. जसा आपला मित्र कोण आणि मैत्रीचा आव आणून जवळ येणारा शत्रू कोण हे ओळखता आलं पाहिजे. कारण खरा मित्र तुम्हाला योग्य तिथ प्रोत्साहन देत यशाच्या शिखरावर पोहोचवेल आणि तुमचे पाऊल चुकीचे पडत असेल तर ते रोखेल. तर मित्राच्या रुपातील शत्रूची मदत घेतल्यास तुमची मेहनत वाया जाईल.

तिसरं सूत्र: नोकरी-व्यवसाय ठिकाणची माहिती

व्यक्ती ज्याठिकाणी काम करते त्या ठिकाणची परिस्थिती, आपले सहकारी यांच्याविषयी संपूर्ण माहिती ठेवणं आवश्यक आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सहकाऱ्यांची मानसिकता, त्यांचे गुण-दुर्गुण याची माहिती असणे आवश्यक आहे.

चौथं सूत्र: जमा-खर्चाचा मेळ राखा

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कमाई आणि खर्च यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. पैशाचं सोंग घेऊ शकत नाही. त्यामुळे या गोष्टीत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कमाईपेक्षा अधिक खर्च, विनाकारण खर्च, चैनीसाठीचा खर्च टाळणे आवश्यक आहे. योग्य तिथे आणि योग्य तितकाच खर्च करणे, तसेच कमाईतून आवश्यक तितका धनसंचय करून ठेवणे आवश्यक आहे.

पाचवं सूत्र: सामर्थ्य ओळखा

व्यक्तीने आपल्या सामर्थ्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजेच एखादी गोष्ट करताना आपलं सामर्थ्य किती आहे ते जाणणं आवश्यक आहे. सामर्थ्य न ओळखता ताकदीपेक्षा अधिकचे कार्य हाती घेतल्यास त्यात अपयश येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी आपली बलस्थानं, सामर्थ्य ओळखणं अधिक महत्त्वाचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या