‘बीसीसीआय’कडून अय्यर, किशन यांना पुन्हा संधी; ‘एनसीए’च्या विशेष प्रोग्रामसाठी निवड

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलाय. या दोघांचाही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) उच्च कार्यक्षमता देखरेख कार्यक्रमासाठी (हाय परफॉर्मन्स मॉनिटरिंग प्रोग्राम) पुन्हा समावेश करण्यात आला आहे. मागील हंगामात रणजी करंडकाचे सामने न खेळल्याबद्दल अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील संघ निवड समितीने श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना ‘बीसीसीआय’च्या पेंद्रीय करारातून वगळले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतर या दोघांना विशेष संघात समावेश करण्यात आला आहे.

श्रेयस, ईशानच्या कामगिरीवर बीसीसीआयचे लक्ष

‘बीसीसीआय’ आणि ‘एनसीए’ यांची श्रेयस अय्यर व ईशान किशन यांच्याबद्दल आता कोणतीच तक्रार नाहीये. स्थानिक क्रिकेटला त्यांनी महत्त्व द्यायला हवे. श्रेयसने मुंबईसाठी व ईशानने झारखंडसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायला हवे. जाणीवपूर्वक स्थानिक क्रिकेटमध्ये न खेळल्याचे परिणाम आता त्यांना माहिती झाले आहेत. दोघांनीही आगामी रणजी हंगामात चांगली कामगिरी केली, तर ‘टीम इंडिया’तही त्यांची निवड होऊ शकते. त्यांच्या कामगिरीवर आपले लक्ष असेल, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी म्हटले आहे. रणजी स्पर्धेला दांडी मारून आयपीएलच्या तयारीला लागल्याबद्दल ‘बीसीसीआय’ने श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना पेंद्रीय करारातून डच्चू देत चांगलाच धडा शिकविला. ही कारवाई एक ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी झालेली आहे. त्यांनी आता स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियात स्थान मिळवावे, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.

एनसीएच्या प्रोग्रामसाठी 30 खेळाडूंची निवड

एनसीएच्या उच्च कार्यक्षमता देखरेख कार्यक्रमासाठी 30 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात श्रेयस अय्यर, ईशान किशन यांच्यासह मुशीर खान, मयंक यादव, उमरान मलिक, आवेश खान, कुलदीप सेन, हर्षित राणा, खलील अहमद, आशुतोष शर्मा, तुषार देशपांडे, रियान पराग, साई सुदर्शन, साई किशोर, देवदत्त पडिक्कल, पृथ्वी शॉ, तनुष कोटियन आदी खेळाडूंचा समावेश आहे.