
>> चंद्रहास रहाटे
अलीकडच्या एका सर्व्हेनुसार, देशातील 80 टक्के नागरिक सेवानिवृत्तीसाठी तयार नाहीत. कारण निवृत्तीनंतर त्यांना मुलांवर अवलंबून राहावे लागेल किंवा कोणत्या तरी धर्मादायी संस्थेचा आधार घ्यावा लागेल. थोडक्यात काय तर ज्येष्ठांना निवृत्ती नकोय.
गेल्या 20 वर्षांत घसरलेला व्याजदर व वाढलेली महागाई यामुळे आज ज्येष्ठ नागरिक वर्ग नामोहरम झाला आहे. बरं, जर विस्ताराने विचार करायचा झाल्यास अनेक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक आपल्याला पाहायला मिळतील. एखादा वर्ग आज त्यांना असलेल्या निवृत्तीवेतनामुळे अथवा निवृत्तीची सोय केल्यामुळे सुखासीन आयुष्य जगत असेल. एखादा वर्ग निवृत्तीनंतर वेतन थांबल्यावर आपल्या मुलांवर अवलंबून असेल, एखादा वर्ग कुणीतरी दिलेल्या देणगीवर जगत असेल, तर एखादा वर्ग वरील कुठल्याच वर्गात न मोडल्यामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असेल. यातला कुठलाही पर्याय ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कळत नकळतपणे निवडला असेल व त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम आज त्यांच्या वाटय़ाला आलेले असतील.
अनेक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर काम करायची इच्छा आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम राहायचे आहे. गेल्या वर्षी हेल्पएज इंडिया या संस्थेने 22 शहरांमध्ये केलेल्या ज्येष्ठांच्या सर्व्हेमधून ही माहिती उघड झाली होती. पाश्चात्त्य देशांमध्ये सोशल सिक्युरिटी सिस्टम अस्तित्वात असल्यामुळे तेथे निवृत्तीनंतर सरकार काळजी घेते, पण हिंदुस्थानसारख्या देशात ही सोय नसल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सोय करावी लागते.
आपण हा लेख वाचत असाल तर आपणही स्वतःला प्रश्न विचारू शकता की, मी त्या 20 टक्के लोकांमध्ये मोडतो की, जे निवृत्तीसाठी तयार आहेत की, मी त्या 80 टक्के लोकांमध्ये आहे, जे अजून निवृत्तीसाठी तयार नाहीत. त्यामुळे आपल्याला निवृत्ती नियोजनाचे पहिले पाऊल टाकावे लागेल.
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत)