डॉ. भागवत कराड-इम्तियाज जलील यांचा शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न-चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर नामकरणावरून भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे शहरातील वातावरण जाणूनबुजून खराब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

हिंदू नववर्षानिमित्त 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येणार्‍या भव्य शोभायात्रेच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खैरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली शहराचे नामकरण संभाजीनगर केले आहे. तेव्हापासून संभाजीनगर हे नाव पडले. तब्बल 35 वर्षांनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरण केले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर नामकरण केले. छत्रपती संभाजीनगर नावाचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर नामकरणाला एमआयएमचे खासदार जलील यांनी विरोध करीत आंदोलन केले. भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम असून, डॉ. भागवत कराड आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे ठरवून दंगल घडवून शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे खैरे म्हणाले.

हिंदू आक्रोश मोर्चात ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी सहभागी व्हावे

छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ उद्या रविवार, 19 रोजी सकल हिंदू संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचे त्यांनी सहभागी व्हावे, मोर्चाला विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ मोर्चा काढत असतील तर शहराचे वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.