‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘साप्ताहिक मार्मिक’ यांच्यातर्फे आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात प्रसाद खानोलकर यांनी लिहिलेली ‘चंद्रफूल’ ही कथा प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली. अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अशोक गोवंडे लिखित ‘अ फ्रेंड इन नीड’ या कथेला द्वितीय क्रमांकाचा तर अमित पंडित लिखित ‘अंतर्धान’ला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. अनुक्रमे पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक व साहित्यसेवक वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित झालेल्या या स्पर्धेला पहिल्याच वर्षी देशविदेशातील लेखकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शंभराहून अधिक कथा स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या होत्या. या स्पर्धेत मंगल कातकर लिखित ‘शोध’, सुरेशचंद्र वाघ लिखित ‘माझी रोबॉटिक मुलाखत’ आणि नवनाथ गायकर लिखित ‘नावात काय आहे’ या तीन कथांना अडीच हजार रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. पारितोषिक विजेत्या कथांपैकी प्रथम क्रमांकाची कथा ‘साप्ताहिक मार्मिक’च्या दिवाळी अंकात प्रकाशित होणार असून अन्य पारितोषिक विजेत्या कथादेखील ‘साप्ताहिक मार्मिक’च्या नियमित अंकांत क्रमशः प्रकाशित होणार आहेत.
नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा, पत्रकार-लेखक-कवी विनोद पितळे आणि ‘साप्ताहिक मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रबोधनचे विजय नाडकर्णी यांनी कथांची प्राथमिक छाननी केली. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे व संस्थेचे गोविंद येतयेकर यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाची पूर्वसूचना सर्व स्पर्धकांना दिली जाईल.