Video – निजामकालीन शाळेची चंद्रपूर जिल्ह्यात दुरवस्था, शंभर वर्षे पूर्ण होऊनही छत नाही

>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या अंतरगाव बुद्रुक येथे निजाम कालीन एक ते सात वर्ग असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. सन 1920 साली या शाळेची स्थापना झाली. शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरपना तालुक्यातील शंभर पूर्ण झालेली एकमेव शाळा आहे. या शाळेची आता दुरवस्था झालेली आहे. या शाळेची इमारत कमकुवत झाली आहे. शाळेच्या छतावर छताचा पत्ता नाही. पाणी गळत असलेल्या खोलीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे.

या शाळेत शिकलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेले. अंतरगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेने औदयोगिक प्रशिक्षण संस्थेला सिद्धार्थ हस्तेसारखा महाराष्ट्र संचालक दिला, बाबुराव मुसळे सारखा आमदार दिला, देवराव मुसळेसारखा जिल्हा परिषद अध्यक्ष दिला. मात्र तीच शाळा आज शासनाच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. या शाळेकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नाही. शाळा ही विद्येचे मंदिर समजली जाते. या विद्येच्या मंदिरााच्या छतावर स्लॅब आहे पण, डोक्यावर साधं कौलारु छत नाही. या शाळेतील एकाच खोलीत तीन वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता तर विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जवळ आली आहे, शिक्षक संपावर आहेत. अशातच अवकाळी वादळी पावसाने शाळेच्या खोलीत पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आमदारांनी दिलेली ताडपत्री उडाली
जिल्हा परिषद शाळेचे छत पावसाळ्यात गळत असल्याने विद्यामान आमदार सुभाष धोटे यांनी छत झाकण्यासाठी शाळेला मदत म्हणून ताडपत्री दिली. गेल्या काही दिवसात पडलेल्या अवकाळी वादळी पावसाने छतावरची ताडपत्री उडल्याने छत पुन्हा एकदा गळायला लागले आहे. आमदारांनी शाळेकडे थोडं लक्ष घालावे व छताची दुरुस्ती करून द्यावी अशी भावनिक साद विद्यार्थी घालत आहेत.

शाळेचे छत लवकरात लवकर दुरुस्त करणार का
शाळेचे मोडलेले छत लवकरात लवकर दुरुस्त करून विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य खोली करून द्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पालक वर्ग उपोषणास बसल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे.