
महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. इंजेक्शन टोचून घेत त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिल्याचे कळते आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डॉ. शीतल आमटे-करजगी यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.
मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले.
विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.































































