
अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुदतपूर्व सुटका झालेल्या एका आरोपीचा पत्ता व कागदपत्र देण्याच्या बदल्यात त्याने लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निदर्शनास आणून दिली. विभागाने सापळा रचून भाईदासला लाच घेताना रंगेहात पकडले.
वॅलेंटाईन पुजारा या व्यक्तीने कोळशाच्या बिलापोटी एका व्यक्तीला धनादेशाच्या स्वरुपात रक्कम अदा केली होती परंतु हे धनादेश बाऊन्स झाले. या प्रकरणी पुजारा याला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली. चंद्रपूर कारागृहात ही व्यक्ती शिक्षा भोगत असताना त्याची मुदतपूर्व सुटका झाली. पुजाराला समन्स बजवाण्यासाठी तक्रारदाराने चंद्रपूरमधल्या कारागृह अधीक्षक भाईदास ढोले याच्याकडे पुजाराचे कागदपत्र व पत्ता मागितला. ढोले याने कागदपत्रांच्या बदल्यात २५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे धाव घेत ढोले विरूद्ध तक्रार दाखल केली. लाचलुचपत खात्याने सापळा रचला. तेव्हा तडजोडी अंतर्गत १५ हजारांची लाच स्विकारताना ढोले याला रंगेहात पकडले असून अटक केली आहे.
































































