चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ काळा गरूड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्मिळ समजला जाणारा “भारतीय काळा गरूड” चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आला. हिमालय पर्वतरांगामध्ये नैसर्गिक अधिवास असलेल्या या गरूडाची महाराष्ट्रात फार कमी नोंदी आहेत. नागभीड येथील पक्षी तज्ज्ञ पक्षीनिरीक्षणासाठी गेले असता हा दुर्मिळ गरूड कॅमेऱ्यात कैद झाला. दुर्मिळ काळा गरूड दिसणे पक्षिमित्रांसाठी पर्वणी ठरली आहे.

हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातील जलाशयात दिसू लागतात. स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी पक्षीमित्रांची पावले जलाशयाकडे वढतात. नागभीड येथील पक्षी तज्ज्ञ डॉ. जी. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रा.निखिल बोराडे, प्रा.अमोल रेवसकर,संजय सुरजुसे हे किटाळी तलाव परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेले. तलावाच्या पाळीवरील झाडावर दुर्मिळ भारतीय काळा गरूड त्यांना आढळून आला. या गरूडाला त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. हिंदुस्थानात काळा गरूड अशी ओळख असलेल्या या गरूडाचे शास्त्रीय नाव “इक्टिनिट्स मलाइन्सिस” असे आहे. हिमालय पर्वतरांगामध्ये या पक्ष्याचा अधिवास आहे. मैदानी प्रदेशात यांची नोंद अभावानेच आढळते.

असा दिसतो काळा गरूड

रंगाने पूर्णतः काळा असल्याने याचे नाव काळा गरूड पडले. त्याच्या चोचीचा तळ गडद पिवळा रंगाची असतो. तर पाय जर्द पिवळ्या रंगाचे असतात. हा शिकारी पक्षी असून सरडे, साप, उंदीर, घूस तर वेळप्रसंगी इतर लहान पक्षाची हा शिकार करतो,अशी माहीती डॉ. देशमुख यांनी दिली.