
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. उद्ध्वस्त झालेली शेती बघून धीर खचलेल्या अनेक शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला. कधी नापिकी तर कधी दुष्काळात होरपळून निघणाऱ्या बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचं मोठं ओझं वाहण्याची दुर्दैवी वेळ ओढावली. ही स्थिती केवळ या वर्षीची नाही. दरवर्षी असं होतयं. यातून खचून न जाता एका गावातील शेतकरी जिद्दीने उभी राहीलेत. गावातील तब्बल पंचवीस शेतकऱ्यांनी मस्त्य पालन सुरू केले. मस्त्य पालनातून होणाऱ्या मिळकतीने त्यांनी हळूहळू आपला आर्थिकस्तर उंचाविला आहे.
शेती आता भरवशाची राहीलेली नाही, हे वाक्य नेहमी कानावर धडकतं. काही अंशी ते खरंही आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झालेला आहे. मोठ्या कष्टाने बळीराजा शेती फुलवतो. प्रसंगी कर्ज काढतो. शेतीत अक्षरशः जीव ओततो. मात्र या शेतीची जेव्हा माती होते तेव्हा हा राजा खचतो. टोकाचा निर्णय घेतो. मात्र संकटाची मालिका सुरू असतानाही काही जण खचत नाहीत. हार स्वीकारत नाहीत. उलट संकटाच्या डोळ्यात डोळे घालून जिद्दीने उभे होतात. संकटांना परतून लावतात, असे जिगरबाज शेतकरी गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथे आहेत.
सकमूर हे गाव वर्धा नदीचा काठावर वसले आहे. एकीकडे वर्धा नदीचे पात्र तर दुसरीकडे जंगल आहे. सकमूर गावातील शेतीला वन्यजीवांचा नेहमीच धोका असतो. तसं वर्धा नदीचे पात्र शेतकऱ्यांना वरदान ठरले. मात्र नदीला पूर आला की शेती भुईसपाट होते. शेतीत होणारे नुकसान बघता गावातील शेतकरी शेतीपुरक व्यवसायाकडे वळले आहेत. गावातील पंचवीस शेतकऱ्यांनी शेतातील शेततळ्यात मस्त्यपालन सुरू केले आहे. शेततळ्यातील मासोळी ताजी असते. त्यामुळे मासोळ्यांना मोठी मागणी वाढली आहे. यातून बरीच मिळकत शेतकऱ्यांना होतेय.
मासोळी विक्रेते थेट शेततळ्यावर
ताजी आणि रूचकर मासोळी मिळत असल्याने ग्राहकांची मोठी मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता दुरवरून मासोळी विक्रते सकमूर गाव गाठतात. आठवड्यातून चार दिवस शेततळ्यातील मासोळी पकडली जाते. या चार दिवसात जवळपास सात ते आठ क्विंटल मासोळी विकल्या जाते.
आर्थिकस्तर उंचावला
सकमूर येथील गजानन काळे हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अनेक प्रयोग त्यांनी शेतात केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता त्यांनी शेतात पाच शेततळी बनविली आहेत. यात विविध जातीचा मासोळ्या त्यांनी सोडल्यात. मासे विक्रीतून त्यांना बराच फायदा होत आहे. त्यामुळं आर्थिकस्तर उंचावला असे त्यांनी सांगितलं.
खचू नका, संकटांचा सामना करा..
शेतीतील नुकसान बघून खचू नका. उलट जिद्दीने उभे रहा. संकटाचा सामना करा. नव्या योजना अमलात आणा.त्यातून यश संपादन करा, असा सल्ला राजू झाडे या शेतकऱ्याने दिला आहे.



























































