महात्मा गांधींच्या वेशातला गणपती बाप्पा पाहिलात का कधी? वाचा सविस्तर

>> अभिषेक भटपल्लीवार

गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं होतं. त्या स्वातंत्र्याचा लढा सत्याग्रहाच्या रुपाने महात्मा गांधींनी देशाच्या तळागाळात रुजवला. त्याच गांधीजींच्या रुपातली गणरायाची मूर्ती चंद्रपुरात आकर्षणाचा विषय ठरली आहे. गंमत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात बनलेली ही मूर्ती ब्रिटीशांपासून लपवण्यात आली होती.

साधारण 90 वर्षांपूर्वी म्हणजे 1940 सालात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक व्यक्ती सत्याग्रही झाला होता. चंद्रपुरातही स्वातंत्र्याची धग पोहोचली. ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यात तरुणांची संख्या मोठी होती. स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येकांचे प्रेरणास्थान महात्मा गांधीजी झाले होते. स्वराज्यासाठी लढा उभारणाऱ्या काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात गांधी वेशभूषेतील गणेश मूर्तीची निर्मिती केली. या मूर्तीत तरुण गांधीजींना बघत होते. या मूर्तीची माहिती इंग्रजांना मिळाली. गांधी वेशभूषेतील ही मूर्ती तरुणांना क्रांतिकारी बनवेल ही भीती इंग्रजांना वाटू लागली. ही मूर्ती ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी सैनिक पाठवले. मात्र तरुणांनी ही मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी हलविली. इंग्रजांपासून सुरक्षित ठेवली.

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही मूर्ती श्री वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराचा पदाधिकाऱ्यांना मंदिरात आढळून आली. या मूर्तीच्या इतिहास बघता त्यांनी ही मूर्ती जपून ठेवली. काचेमध्ये ही मूर्ती बंदिस्त असते. मूर्तीच्या खाली संगम वरील दगडावर या मूर्तीच्या इतिहास थोडक्यात लिहिला गेला आहे.