न्यायाधीशांच्या घरी चोरट्याचा डल्ला, चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ

न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. वरोरा शहरात भाड्याने राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले असता घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. सोने, चांदी रोख असा हजारो रुपयाचा ऐवज चोरांनी लंपास केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सीनियर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी डी.आर. पठाण हे वरोरा शहरातील देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागील ओम शांती नगरातील चंद्रकांत पुसदकर यांच्या घरी अनेक दिवसापासून भाड्याने राहत आहेत. काही दिवसापूर्वीच ते बाहेर गावी गेले होते.

चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे बघत घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरानी घरातील बारा ग्रॅम सोन्याची चेन, दहा हजार रोख, सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर चोरले. घरी परत आल्यावर चोरी झाल्याचे न्यायाधीशांच्या लक्षात आले. त्यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. वरोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेचा तपास वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करत आहे.