धक्कादायक! शेअर बाजारात पैसे गमावले; पोलीस बनला चोर, CCTV फुटेजमधून चोरी उघड

cctv-chandrapur

ज्या पोलिसांवर सर्वसामान्य माणूस रक्षणाची भिस्त ठेवतो, त्याच एका पोलिसानं चक्क घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेत नरेश डाहुले नावाचा पोलीस कार्यरत आहे. त्याने ही घरफोडी केली आहे.

चंद्रपूर शहरातील उपगनलावार ले-आऊट येथे मुस्तफा शेख यांचे घर आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने 11 ते 14 नोव्हेंबरदरम्यान घराला कुलूप होते. नेमक्या याच संधीचा फायदा नरेशने उचलला. शेख कुटुंब परत आल्यावर त्यांनी या प्रकाराची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार तपास सुरू झाला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. येथील सीसीटिव्ही कॅमेरात नरेश कैद झाला आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्वाच्या विभागात काम करणारा जबाबदार पोलीस या कृत्यात अडकल्याने खात्यात खळबळ उडाली. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता अनेक खुलासे पुढे आले त्यात त्याने दोन घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं.

नरेश डाहुले याला शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची सवय लागली होती. त्यासाठी तो परिचित लोकांकडून उधारी घेवू लागला. शेअर बाजारात सतत फटका बसत असल्याने त्याच्यावर 22 लाख रुपयांचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने घरफोडीचा मार्ग पत्करला.