चंद्रपूरचे देवी महाकाली मंदिर दर्शनासाठी खुले

कोरोना साथरोग संकटाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील मंदिरं मार्च महिन्यापासून दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. काही काळानंतर अनलॉक सुरू झालं आणि देशभरात टप्प्याटप्प्याने मंदिर उघडण्यात आली. मात्र महाराष्ट्र सरकारने कोरोना बाधितांची मोठी संख्या व संसर्गाची स्थिती लक्षात घेता अनलॉक प्रक्रियेत मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नव्हती.

आता दीपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना पूर्वीप्रमाणेच खुली करण्याची परवानगी दिली. त्यानुसार चंद्रपूरचे जागृत देवस्थान असलेले देवी महाकाली मंदिर आज पहाटेपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले.

गेले काही महिने केवळ दैनिक पूजा विधी व सणांच्या काळातील विशेष पूजा यांच्यासाठीच मंदिराचे विश्वस्त व पुजारी यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात होता. मात्र आज पहाटेपासून मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात आहे.

या निर्णयाचे भक्तांनी स्वागत केले असून भक्तांच्या प्रवेशाआधी संपूर्ण मंदिराची स्वच्छता- निर्जंतुकीकरण केले जात आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची प्रवेशावेळी तापमान मोजणी व निर्जंतुकीकरण केले जात असून, कोरोना संसर्ग टाळण्याची काळजी घेतली जात आहे.

दरम्यान महाकाली देवीच्या या मंदिरात कोरोनापूर्वी गाभाऱ्यात प्रवेश दिला जात होता. मात्र अनलॉक प्रक्रियेत आजपासून देवीच्या थेट गाभाऱ्यातील प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल व फैलाव टाळता येईल अशी आशा मंदिर विश्वस्त व पुजारी यांनी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या