चंद्रपुरात कोरोना रुग्णांना भोजन पुरवठा करण्यात भ्रष्टाचार, नगरसेवक पप्पू देशमुख यांचे मुंडन आंदोलन

कोरोना काळात विलगीकरणात असलेल्या रुग्णांना भोजन पुरवठा करण्याची जबाबदारी चंद्रपूर शहर मनपाची होती. महानगरपालिकेने यासाठी स्वतःच्या अधिकारात तातडीने कंत्राटदार नेमत भोजन पुरवठा सुरू केला होता.

मात्र, हे कंत्राट मध्येच रद्द करण्यात आले. सुरळीत सुरू असलेले कमी दराचे कंत्राट रद्द करून चढ्या दराच्या कंत्राटाला परवानगी देत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.

गेल्या काही आमसभांत विरोधी नगरसेवक हा मुद्दा उचलून धरत आहेत. महापौरांनी यासंबंधी आजच्या आमसभेत चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, ही चौकशी थातूरमातूर झाल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज आमसभेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. सोबतच सभात्याग करत महापालिकेबाहेर मुंडन आंदोलन केले.

आपल्या मागण्यांची एक प्रत त्यांनी महापौरांना देखील दिली आहे. या भोजन पुरवठ्याच्या घोटाळ्याची आमसभेत वाच्यता झाली असतानाही महापौरांनी मात्र या संपूर्ण विषयावर मौन साधले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या