Chandrapur News : दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

दोन वाघांच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पअंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी बफरमध्ये कक्ष क्रमांक 63 मध्ये ही घटना घडली. दोन वाघांची झुंज झाली असून यामध्ये छोटा मटका या वाघाने दुसऱ्या वाघाला झुंजीत ठार केले आहे. सोमवारी सगळीकडे जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना सुरू होती.

सोमवारी सफारी करत असलेल्या पर्यटनकांना तसेच मचानावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अचानक दोन वाघाची झुंजीचा आवाज ऐकू आला. वाघाचा शोध घेतला असता, त्यामध्ये एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला. तसेच दुसऱ्या वाघाचे नाव छोटा मटका असून हा सुद्धा जखमी झाला आहे. यावेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित सहायक वनसंरक्षक दुबे, खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत, क्षेत्र सहाय्यक हटवार, वनरक्षक लोखंडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते. मृत्यू पावलेल्या वाघाला पी.एम. साठी चंद्रपूर टीटीसी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. छोटा मटका या वाघाने आतापर्यंत तीन वाघाला ठार केलेले आहे. या अगोदर त्यांनी अर्जुनी गावातील शेत शिवार परिसरात एक वाघ तर मागील वर्षी बजरंग या ताडोबातील नावाजलेल्या वाघाला ठार केले होते.