चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निलंबित, लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते विवेक पेंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यालयामध्ये लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच पेंढे सेवानिवृत्त होणार असून तत्पूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता विवेक पेंढे हे वर्धा येथून चंद्रपूर जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. तेव्हापासूनच त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. अडीच महिन्यांपूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. या बैठकीत आमदारांनी कार्यकारी अभियंता पेंढे यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला होता. पेंढे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सर्वच आमदारांनी लावून धरली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. मात्र, पेंढे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर त्यांच्या बाजूने निर्णय लागला.

पदाची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंता पेंढे यांनी कार्यालयातच काही दिवसांपूर्वी लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल केला. यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली. दरम्यान, परवानगी नसताना काही कामांचे वर्क ऑर्डर देणे व कार्यालयात सतत गैरहजर राहणे, असा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी पेंढे यांना निलंबित केले. पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कळते.