चंद्रपूरच्या खड्ड्यात ‘टायटॅनिक’ जहाज बुडेल; खड्ड्यांवरून सोशल मीडियावर मीम्सचे चिमटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाय उचलला की खड्ड्यात पडेल, अशी अवस्था चंद्रपूर शहरातील मार्गांची झाली आहे. मनपा तथा लोकप्रतिनीधींचे याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. आता रस्त्यावरील प्रश्न घेऊन समाजमाध्यमात चिमटे काढण्यात येत आहेत. टायटॅनिक चित्रपटातील शेवटचे दृश्य खड्यात दाखवून टायटॅनिक जहाज चंद्रपुरातील खड्ड्यात बुडाले, असे मिम्स वायरल झालेत. या मिम्सवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

चंद्रपूरची ओळख ब्लॅक सिटी अशी आहे. काळं सोनं देणाऱ्या या शहराची ओळख येथील ताडोबा व्याघ्रप्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर पोहोचली. प्रदुषित, उष्ण शहर ही वेगळी ओळख आहेच. ताडोबातील वाघ बघायला देश-विदेशातून पर्यटक येथे येतात. मात्र या शहरातील मार्ग मरणवाट ठरले आहेत. महानगर पालिका, लोकप्रतिनिधी यांचे रस्त्यांच्या अवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. अश्यात आता समाजमाध्यमातून शहरवासीय प्रशासनाला चिमटे घेत आहेत. यावर अनेक मिम्स तयार करून समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. या मिम्सना मोठा प्रतिसाद लाभत आहे. फेसबुकवर मिम्सवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. टायटॅनिक जहाज चंद्रपूर शहरातील खड्ड्यात बुडालं, हे मिम्समधून दाखवलं गेलं. तर शहरातील काही समाजसेवक फेसबुकवर लाईव्ह करीत खड्ड्याचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘जोर’ कमी पडला

चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या विकासकामांचे मोठमोठे बॅनर शहरात झळकले. मात्र बागला चौकातील मार्गातील खड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जोरगेवारांचा जोर कमी पडल्याची बोचरी टीका समाजमाध्यमात होत आहे.

धीर किती धरावा?

कॅबिनेट मंत्री तथा भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचेही खड्ड्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. चंद्रपूर मनपामध्ये भाजपाची सत्ता होती. विकासकामामुळे नाही तर कथित भ्रष्टाचारामुळेच मनपा प्रकाशझोतात होती. कोटी-कोटींची विकासकामे केल्याचे बॅनर शहरात दिसतात. या कोटीतून शहरातील मार्गाचा प्रश्न का सोडवण्यात आला नाही असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.