
कोरोनाच्या प्रकोपाने अनेक व्यवसायांवर संक्रांत आली आहे. परीट व्यवसाय हा त्यापैकीच एक. गेल्या चार महिन्यांपासून या व्यवसायाला जी घरघर लागली, ती अजूनही कायम आहे.
कोरोनामुळं लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाल्यानंतर परीट समाजाचा पारंपरिक कपडे धुण्याचा व्यवसाय संकटात सापडला. या व्यवसायाला आधार देणारे घटक अजूनही सुरू झालेले नाहीत. त्यामुळं संपूर्ण परीट समाजावर आर्थिक संकट आलं आहे. या व्यवसायाला सर्वात मोठी मदत व्हायची ती हॉटेल व्यवसायाची, घरगुती कपड्यांची. पण गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळं एक मोठा ग्राहक या समाजाच्या हातून गेलाय. लग्न किंवा इतर समारंभ होत नसल्यानं महागडी कापडं ना धुवायला येत आहेत, ना प्रेस करायला. घरगुती कपडेही इस्त्रीसाठी येईनासे झालेत. त्यामुळं धोबी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्याची घडीच विस्कटली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
कोरोनामुळं अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांची मोठी हानी झाली आहे. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. एकीकडे कोरोनाचा मार आणि दुसरीकडे आर्थिक हलाखी अशा दुहेरी कात्रीत हे व्यवसायी सापडले आहेत.




























































